कैद्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
गडचिरोली -
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज गडचिरोली जिल्हा खुले कारागृहाला भेट देऊन कारागृहातील विविध व्यवस्थांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी कैद्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या कौशल्य विकासासाठी शेतीव्यतिरिक्त विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर विशेषभर देण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी कैद्यांशी संवाद साधत आतापर्यंत कोणती नवी कौशल्ये आत्मसात केली आहेत, कोणते प्रशिक्षण घ्यावेसे वाटते, तसेच विणकाम, वाडीकाम, शेतीपूरक उद्योगांसह इतर कोणती कामे करता येऊ शकतात याबाबत सविस्तर विचारपूस केली. कैद्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कौशल्य विकासाचे नियोजनबद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी करताना कैद्यांना जेवण व नाश्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. तसेच कारागृहातील औषधसाठा, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणारी कार्यवाही याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

याशिवाय सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्वच्छता, पावसाळ्यात पाण्याची गळती होते का, कारागृहातील ग्रंथालय व त्याचा वापर, दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची स्थिती, त्यांना मिळणारी सुट्टी व कुटुंबीयांशी भेटीची व्यवस्था याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. जिल्हा विकास निधीतून कारागृहासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी कारागृहातील सुविधा, सुरू असलेली कामे व भावी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती सादर केली.


यावेळी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. पी. सदाफळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, कारागृह पोलीस निरीक्षक वैभव आत्राम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष मेश्राम, उद्योग निरीक्षक पूनम कुसराम यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments