आरोग्य सुविधांचा बोजवारा; आरमोरी–कुरखेड्यासाठी ब्लड बँकची जोरदार मागणी – आमदार रामदास मसराम आरोग्य सुविधेला घेऊन आक्रमक


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


गडचिरोली:- आरोग्य सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी किंवा कुरखेडा येथे तातडीने स्वतंत्र ब्लड बँक स्थापन करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रक्त उपलब्ध होण्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अपघात, प्रसूती व गंभीर आजारांच्या वेळी रुग्णांना चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे हलवावे लागते, त्यामुळे उपचारास विलंब होऊन जीवितहानीचा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार मसराम यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली असून, तातडीने भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याची गंभीर समस्या त्यांनी मांडली. काही ठिकाणी रुग्णवाहिका नसणे, चालकांची कमतरता आणि तांत्रिक बिघाड यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरमोरी किंवा कुरखेडा येथे सुसज्ज ब्लड बँक स्थापन केल्यास परिसरातील हजारो नागरिकांना तातडीची व प्रभावी आरोग्य सेवा मिळू शकेल, असा विश्वास आमदार मसराम यांनी व्यक्त केला.


आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या या मागणीचे स्वागत करत लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments