प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक
चामोर्शी/मुलचेरा:
चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी गैर-आदिवासींनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा गंभीर आरोप करत, आता या जमिनी मुक्त करण्यासाठी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना आणि बिगर सातबारा शेतकरी संघटना यांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी चामोर्शी कडे निवेदन सादर करून प्रशासनाने सात दिवसांच्या आत ठोस कारवाई न केल्यास चामोर्शी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यात अनेक वर्षांपासून आदिवासींच्या मालकीच्या जमिनींवर गैर-आदिवासी व्यक्तींनी कब्जा केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ३६-ए नुसार, आदिवासींची जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाही. असे असूनही, अनेक ठिकाणी कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा धाकदपटशहा दाखवून या जमिनी हडपण्यात आल्या आहेत. यामुळे मूळ आदिवासी मालक आपल्याच जमिनीपासून वंचित झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रशासनाला शेवटचा इशारा:
या संदर्भात आज उपविभागीय अधिकारी (SDO) चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे व पदाधिकारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की "क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी जल, जंगल आणि जमिनीसाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्याच भूमीत आज आदिवासींच्या जमिनी सुरक्षित नाहीत, ही शरमेची बाब आहे. महसूल विभागाने तातडीने या प्रकरणांची चौकशी करून बेकायदेशीर फेरफार रद्द करावेत आणि जमिनीचा ताबा मूळ आदिवासी मालकांना मिळवून द्यावा." अशी मागणी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा माणिकराव शेडमाके यांनी केली आहे
आंदोलनाची रणनीती:
जर प्रशासनाने दिलेल्या मुदतीत जमिनी मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही तर उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला यावेळी आदिवासी अन्याय ग्रस्त शेतकरी रमेश मडावी सुखदेव मडावी सहित पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment