विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली, दि. ७ ऑक्टोबर
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज धानोरा तालुक्यात आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते नागरिकांना विविध सेवांचे वितरण करण्यात आले. दौऱ्यादरम्यान त्यांनी वैयक्तिक वनहक्क दावे शिबिरात मार्गदर्शन केले, डिजिटल पीक पाहणी केली तसेच राष्ट्रीय महामार्ग व एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाचा आढावा घेतला.
मौजे पन्नेमारा येथे वैयक्तिक वनहक्क दावे सादर करण्यासाठी आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये अतिक्रमणासंदर्भातील पुरावे उपलब्ध नाहीत, अशा प्रकरणांत पंचनामे, गावातील ज्येष्ठ नागरिकांची प्रतिज्ञापत्रे आणि गुगल इमेज यांच्या आधारे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी महसूल व वन विभागाला दिले.
मौजे येरकड येथे शेतकरी तेजनाथ शिंपी यांच्या शेतात जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटल पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि पीक नोंदणीबाबत माहिती जाणून घेतली.
धानोरा–मुरूमगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे ढवळी येथे भेट दिली. महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर यांना दिले.
तसेच एकलव्य निवासी शाळा, धानोरा येथील शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून सदर काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तहसील कार्यालय, धानोरा येथे तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी तालुक्यातील विविध समस्यांबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांकडून माहिती घेऊन आढावा घेतला.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम., सहायक जिल्हाधिकारी डॉ. अजय डोके, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, तहसीलदार गणेश माळी तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment