विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली देसाईगंज
आरमोरी विधानसभा मतदारसंघातील आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा व कोरची तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची तातडीने दखल घेऊन बाधित भागात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत व धान बोनस द्यावा, अशी मागणी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे निवेदन सादर केले. धान बोनसचे निवेदन मुख्यमंत्री तसेच सहपालकमंत्र्यांना सादर झाल्याने गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरी विधानसभा मतदारसंघातील चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अनेक गावांमध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्याचबरोबर धान पिकावर करपा, तुळतुळा तसेच इतर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला; मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे उभे पीक खराब झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
निवेदनात आरमोरी विधानसभा मतदारसंघातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यांतील बाधित गावांमध्ये महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झालेल्या धान पिकाची स्वतंत्रपणे नोंद घेऊन शासन नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
करपा, तुळतुळा व इतर रोगराईमुळे झालेल्या पीक नुकसानीची कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र नोंद करावी. बाधित शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत आणि शासनाच्या इतर उपलब्ध योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणीही कृष्णाजी गजबे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धान बोनस हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री जयस्वाल यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेऊन लवकरच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. धान बोनस मिळाल्यास अतिवृष्टी व पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, नुकसानभरपाई द्यावी आणि धान बोनस मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली आहे.

Post a Comment