विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी :
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धान्य पिकावर रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांचे धान्य पीक फस्त होण्याच्या मार्गावर आहे.. या मुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या धान्य पिकाची पाहणी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आणि माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धानपिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यंदाच्या हंगामात विविध भागातील धानपिकांवर खोडकीड, गेरवा, गादमाशी तसेच मावा-तुडतुडा यांसारख्या रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. रोगराईमुळे धानपिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, आवश्यक कृषी निविष्ठा व रोग-किड नियंत्रणाबाबत प्रभावी उपाययोजना उपलब्ध करून देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी विधानसभा क्षेत्र सहअध्यक्ष सुनिल नंदनवार, तालुका अध्यक्ष बि. टी. सेलोकर, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष रुषाली भोयर, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा गोंदोळे, महिला तालुका अध्यक्ष शुभांगी गराडे, शहर उपाध्यक्ष प्रशांत मोगरे, युवती तालुका अध्यक्ष पल्लवी रामटेके, शेतकरी पंकज सपाटे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment