विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक
आरमोरी : आरमोरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या परिसरात अस्वच्छतेने अक्षरशः कळस गाठला असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरातील नाल्याही कचऱ्याने तुंबल्या असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.वसतिगृहाच्या आजूबाजूला साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या, वाढलेली झाडे-झुडपे आणि दुर्गंधी यामुळे डास, माशा तसेच विविध जीवजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. विशेषतः कचऱ्याचे ढीग व झुडपांमध्ये साप लपण्याचा धोका कायम असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहायची का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित एवढा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही परिसराची नियमित स्वच्छता होत नसेल, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. जपतलाई येथील घटनेसारखी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.वसतिगृह परिसराची तातडीने पाहणी करून कचऱ्याचे ढीग हटवावेत, तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करावी, झाडे-झुडपे काढावीत, परिसर निर्जंतुकीकरण करावे आणि नियमित कचरा संकलनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून ‘दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने कारवाई करा’, अशी रोखठोक मागणी त्यांनी केली आहे.नगर परिषद प्रशासनाने केवळ एकदाच स्वच्छता मोहीम राबवून विषय संपवू नये, तर वसतिगृह परिसरासाठी नियमित स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची ठोस यंत्रणा उभी करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही; प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करून त्याचा अहवाल द्यावा, अशी मागणी प्रज्ञा निमगडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

Post a Comment