आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात! नियमित RFO असतानाही प्रभारी अधिकाऱ्यांकडे सूत्रे; नागरिकांची कामे रखडली, वारंवार कार्यालयीन चकरा मारण्याची वेळ

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील प्रशासकीय कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) कार्यरत असतानाही कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याने विविध शासकीय व निमशासकीय कामांवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडोले हे आरमोरी वनपरिक्षेत्राचे नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी असताना प्रभारी अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांच्याकडे या कार्यालयाची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे. या दुहेरी प्रशासकीय परिस्थितीमुळे कार्यालयीन कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
कामांसाठी नागरिकांची फरफट; कार्यालयात चकरांवर चकरा!
वनविभागाशी संबंधित कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रभारी अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांना कामे न होताच परतावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
याचा फटका शेतकरी, विविध योजनांचे लाभार्थी तसेच इतर शासकीय विभागांनाही बसत असल्याचे सांगितले जात आहे. आवश्यक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
नियमित अधिकारी असताना प्रभारी कारभाराचा अट्टहास कशासाठी?
आरमोरी वनपरिक्षेत्रात नियमित RFO असतानाही प्रभारी अधिकाऱ्यांकडे कामकाजाची जबाबदारी का ठेवण्यात आली आहे? या प्रशासकीय व्यवस्थेमागील कारण काय? यामुळे सामान्य जनतेच्या कामांना विलंब का होत आहे? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणामागील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्राला नियमित अधिकारी मिळणार तरी कधी?
वनविभाग हा ग्रामीण भागातील शेतकरी, लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा विभाग आहे. अशा विभागातच कामकाजाबाबत अनिश्चितता आणि दिरंगाई निर्माण होत असेल, तर सामान्य जनतेने दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार नियमित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सोपवून नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या प्रकाराविरोधात आंदोलन करण्याचा प्रशासनाला निर्वाणीचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
आता वरिष्ठ वनविभागीय अधिकारी या प्रकरणाची कितपत दखल घेतात आणि आरमोरी वनपरिक्षेत्रातील प्रशासकीय कारभाराला शिस्त लावण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदर्भ दखल न्यूज गोर गरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज मागणी तुमची, कलम आमची!

0/Post a Comment/Comments