विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज
देसाईगंज : देसाईगंज शहरातील गजबजलेल्या मुख्य मार्गावर काल १३ नोव्हेंबर रोजी भरधाव पिकअप वाहनाने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात सात जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.
त्यानंतर त्यांनी देसाईगंज येथील शासकीय रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जखमींना देण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. जखमींना योग्य व तातडीचे उपचार मिळावेत, याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.
दरम्यान, या गंभीर अपघाताची दखल घेत माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधून अपघातास जबाबदार असलेल्या वाहनचालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता कडक कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अपघातातील सर्व जखमी नागरिक लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी सदिच्छा माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या जनहितार्थ कार्याबद्दल जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment