विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आधारभूत धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा!शेतकऱ्यांची प्रसिद्धीपत्रकातून प्रशासनाकडे जोरदार मागणी.!
विदर्भ दखल न्यूज | गडचिरोली
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी सध्या खरीप हंगामातील हलक्या व मध्यम प्रजातीचे धान मळणीला आले असून सध्या धान्य मळणीचे काम जोरात सुरू आहे मात्र शासकीय, आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही शेतकरी आपली अडचण लक्षात घेता खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावामध्ये धान्य विकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आणि कोणताही विलंब न करता आधारभूत धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
धान हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून, शेतीच्या उत्पादनावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, धान खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
शासनाकडून हमीभाव जाहीर केला जात असला, तरी प्रत्यक्षात धान्य खरेदी केंद्रे वेळेवर सुरू झाली नाहीत तर या हमीभावाचा शेतकऱ्यांना काय उपयोग? असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र आधारभूत धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, तसेच धान खरेदीसाठी आवश्यक बारदाना, वजनकाटा व इतर सुविधांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकातून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा आणि त्यांची आर्थिक पिळवणूक थांबावी, यासाठी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
विदर्भ दखल न्यूज गोर गरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज मागणी तुमची, कलम आमची!

Post a Comment