विदर्भ दखल न्यूज |
गडचिरोली
कुरखेडा : कुरखेडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध देशी व विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शहरातील विविध भागांत तसेच ग्रामीण परिसरात दारूची विक्री होत असल्याचे बोलले जात असून, काही ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, कुरखेडा शहरातून तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये देशी-विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. शहरातून ग्रामीण भागात दारू पोहोचविण्याची व्यवस्था नेमकी कोणामार्फत चालते, याचा शोध घेण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
शहरातून ग्रामीण भागात दारूचा पुरवठा कोणाच्या आशीर्वादाने?
कुरखेडा शहरातील विविध ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शहरापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील गावागावांतही देशी-विदेशी दारू पोहोचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कथित अवैध व्यवसायामागील पुरवठादार, विक्रेते आणि संबंधित साखळीचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
खुलेआम दारू विक्रीला आळा घालणार कोण?
अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेषतः तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिस प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन!
या संदर्भात कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, अवैध दारू विक्रीच्या व्यवस्थेविरोधात बंदोबस्त करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाईची गरज!
कुरखेडा शहरातील कथित अवैध दारू विक्री, खुलेआम सुरू असल्याची चर्चा आणि ग्रामीण भागात होणारा दारूचा पुरवठा या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शहरातून खेड्यापाड्यांपर्यंत दारू पोहोचविणाऱ्या पुरवठा साखळीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता पाहावे लागेल की, पोलीस प्रशासन केवळ कारवाईचे आश्वासन देते की प्रत्यक्षात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलते!
विदर्भ दखल न्यूज
गोरगरीब सामान्य जनतेचा बुलंद आवाज!
मागणी तुमची, कलम आमची!

Post a Comment