*सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी ६५ रुग्ण रवाना* *भाजपा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य शिबिरातून रुग्णांना मिळतोय उपचाराचा आधार*

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
कुरखेडा 


 भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा तथा विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या पुढाकारतून श्रीराम विद्यालय श्रीराम मंदिर   कुरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य निदान व उपचार शिबिरांतर्गत आज, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील ६५ रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयात भारतीय जनता पार्टी कुरखेडा कार्यालयातून  रवाना करण्यात आले.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले.

भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा आणि सावंगी मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ नोव्हेंबर रोजी कुरखेडा येथे भव्य आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तालुक्यातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान ज्या रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले, अशा रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात २ नोव्हेंबर रोजी ३८ रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात ६५ रुग्णांना रवाना करण्यात आले. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १०३ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक शस्त्रक्रियांची सुविधा मिळण्यास मोठा आधार मिळत आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये ज्येष्ठ नेते गणपतराव सोनकुसरे आदिवासी आघाडी जिल्हा सचिव  कृष्णाजी  चंद्रमा सर, आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री  हरिदास कुंजाम , वडे गावचे माजी उपसरपंच भाग्यवान जनबंधू  जगदीश मानकर आकाश पिल्लारे बंटी देवढगले, लोमेश किरसान सावंगी मेघे रुग्णालयाचे मंगेश देगळे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या आरोग्यसेवा उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना उपचाराची नवी आशा मिळत आहे.

0/Post a Comment/Comments