*बिरसा मुंडा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! – विनोद मडावी यांची मागणी* जनजातीय गौरव दिन निमित्ताने केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे जोरदार मागणी


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
गडचिरोली | दि. १४ नोव्हेंबर २०२६


महान आदिवासी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी देशभरात ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे महान आदिवासी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

 भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात ब्रिटिश राजवटीच्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध ऐतिहासिक ‘उलगुलान’ क्रांती उभी केली. आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, संस्कृती, अस्मिता आणि पारंपरिक हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्षात व्यतीत केले. त्यांचा लढा केवळ आदिवासी समाजाच्या हक्कांपुरता मर्यादित नव्हता, तर तो स्वातंत्र्य, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठीचा ऐतिहासिक संघर्ष होता.


याबाबत बोलताना विनोद मडावी म्हणाले की, आज देशभरात जनजातीय गौरव दिन साजरा केला जात आहे. आदिवासी महापुरुषांच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. मात्र, आदिवासी समाजाला केवळ जयंती उत्सव, भाषणे आणि सरकारी घोषणांमधून सन्मान नको, तर त्यांच्या महापुरुषांच्या ऐतिहासिक बलिदानाला देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानातही योग्य स्थान मिळाले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, जर केंद्र आणि राज्य सरकारला खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा गौरव करायचा असेल, तर क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासी महापुरुषांचा सन्मान हा केवळ प्रतीकात्मक न राहता तो राष्ट्रीय पातळीवर कृतीतून दिसला पाहिजे.
-------------------------------
कार्यक्रमाच्या जाहिराती व खर्च पाहता ही भाजपाची प्रचार सभा आहे की काय? अशी टीका करत सरकारी कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याची प्रथा देशाला घटक असल्याचा घणाघात विनोद मडावी यांनी केला.
---------------------------------

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा आयोजित होत आहे. *त्यामुळे याच व्यासपीठावरून भगवान बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेऊन केंद्र सरकारने "भारतरत्न" पुरस्कार जाहीर करण्याची मागणी आजाद समाज पक्षाने केली.*

भगवान बिरसा मुंडा यांना भारतरत्न देणे म्हणजे केवळ एका महान क्रांतिकारकाचा गौरव नव्हे, तर देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांच्या संघर्षाचा, बलिदानाचा, स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक योगदानाचा सन्मान ठरेल.
----------------------

विनोद गुरुदास मडावी
जिल्हा प्रभारी, आझाद समाज पार्टी
महाराष्ट्र.

0/Post a Comment/Comments