विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोली : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींची दखल घेवून शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बाहेरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्त न करता गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्याचा अनुभव असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने शासनाकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर, भंडारा तसेच छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. हे रुग्ण माडिया, गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, बंगाली अशा भाषा बोलणारे व दुर्गम भागातील बहुभाषिक असतात. त्यामुळे या जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव असलेल्या जेष्ठ डॉक्टर - वैद्यकीय अधिकारी यांचीच नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून होणे रुग्णांना दिलासा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन गडचिरोली जिल्ह्यात किंवा जिल्हा रुग्णालयात गेले बारा - पंधरा वर्षे रुग्ण सेवेत सक्रिय असलेल्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय हे जोडलेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टरांची टीम गडचिरोली येथील महिला रुग्णालय नियमित रुग्ण सेवेसाठी नियुक्त करावी. व महिला रुग्णालय, गडचिरोली येथे कार्यरत तज्ज्ञ डाॅक्टरांची अहेरी येथील महिला रुग्णालयात नियमित सेवेसाठी नियुक्त करावी, जेणेकरून डाॅक्टरांअभावी दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बाल मृत्यू टाळण्यासाठी मदत होईल. करीता आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.

Post a Comment