श्रमदानातून करपडा घाटावरील पुलाची स्वच्छता; नागरिकांनी दिला माणुसकीचा संदेश

विदर्भ दखल न्यूज 
वैरागड 


 मागील काही दिवसांपूर्वी खोब्रागडी नदीला आलेल्या पुरामुळे वैरागड–रांगी मार्गावरील करपडा घाट येथील पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा व झाडाझुडपांचा पालापाचोळा वाहून आला होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा कचरा पुलावरच पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तसेच वाहनचालक व प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता करपडा (सोनपूर) येथील नागरिकांनी पुढाकार घेत श्रमदानातून पुलावरील कचरा हटवून स्वच्छता केली. रामदास डोंगरवार ,दिनेश बनकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी प्रत्यक्ष श्रमदान करत पुलावर साचलेला कचरा बाजूला करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
सार्वजनिक ठिकाणी एखादी झाडाची फांदी पडली तरी ती आपली जबाबदारी नसल्याच्या मानसिकतेने अनेक जण पुढे निघून जातात. मात्र, करपडा येथील नागरिकांनी या प्रवृत्तीला छेद देत ‘सार्वजनिक ठिकाण म्हणजे आपलीही जबाबदारी’ हा संदेश कृतीतून दिला आहे.
पुरामुळे वाहून आलेल्या कचऱ्यामुळे पुलावरील रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना अडचणी येत होत्या. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढली होती. ही बाब लक्षात घेऊन रामदास डोंगरवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत पुलाची स्वच्छता केली.
श्रमदानानंतर पुलावरील कचरा हटल्याने वाहनांची ये-जा सुरळीत झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासकीय मदतीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे करपडा परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.यासाठी बंडू नवघडे, नेताजी नेवारे, डोमा शंभरकर,सुनिल धोंगळे यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments