बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचा निर्धार!* *आरमोरीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि तलाठी कार्यालयाच्या नियमबाह्य पाडकामाविरोधातील लढ्याला बळ*


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 
आरमोरी, दि. १६ ऑक्टोबर २०२६ :


आरमोरी येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण आणि तलाठी कार्यालयाच्या नियमबाह्य पाडकामाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांच्या वतीने चेतन निमगडे उपोषणास बसले आहेत सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, पाच दिवस उलटूनही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या उपोषणाला बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मेश्राम सर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट देत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि न्याय मिळेपर्यंत सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

शासकीय जमीन ही जनतेची मालमत्ता आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून भूखंड पाडले जात असतील, तर त्याची चौकशी करणे आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयाचे पाडकाम नियमांनुसार झाले की नाही, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी निश्चित करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे.

प्रशासनाला रोखठोक सवाल असा आहे की, सामान्य नागरिकांनी न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार नसेल, तर जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे? केवळ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे जबाबदारी ढकलून प्रश्न सुटणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वस्तुस्थिती तपासावी, कागदपत्रांची पडताळणी करावी आणि मागण्यांवर स्पष्ट लेखी निर्णय द्यावा.

बहुजन समाज पार्टीने दिलेला पाठिंबा हा या आंदोलनासाठी महत्त्वाचा आधार ठरला आहे. अन्यायाविरुद्धचा हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, शासकीय मालमत्तेचे संरक्षण आणि प्रशासनातील उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठीचा लढा आहे.

“आम्हाला आश्वासनांची खैरात नको, तर न्याय्य आणि कायदेशीर कारवाई हवी. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी व्यक्त केली.

आता तरी प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आंदोलन उपोषण स्थळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मेश्राम सर बाबा घुटके, प्रशांत दोनाडकर, मनोज खोब्रागडे कृपानंद सोनटक्के आदींची उपस्थिती होती 

0/Post a Comment/Comments