राणी खेडेगाव येथील ३ बालकांच्या मृत्यूवर माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त; प्रशासकीय यंत्रणेला मदतीचे आदेश* *कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन व्यक्त केली संवेदना; पावसाळ्यात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन*


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
*१ ऑगस्ट २०२६*


कुरखेडा:--- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शनिवारी सती नदीत तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आंघोळीदरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी तात्काळ सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

राणी खेडेगाव येथील तीन शाळकरी मुलांचा सती नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी कळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेच कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे उपस्थित मृत विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक आणि गावकऱ्यांची भेट घेऊन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी अत्यंत आपुलकीने विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगात संपूर्ण जनसमुदाय व शासन-प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासित केले.

उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी थेट चर्चा केली. मृतदेहांचे शवविच्छेदन व इतर कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राणी खेडेगाव येथील सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (६ वर्षे), कुणाल रमेश दूधकवर (५ वर्षे) आणि मोहित हिवराज सराटे (११ वर्षे) या तिघांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या वाढत्या प्रवाहामुळे पालकांनी लहान मुलांना एकटे न पाठवता विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments