विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली -सन २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण सुमारे २१८ संलग्न महाविद्यालयांचा प्रशासकीय कारभार या विद्यापीठामार्फत चालविला जात आहे. मात्र, सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय सध्या नागपूर येथे कार्यरत असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय कामांसाठी वारंवार नागपूर येथे जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
राज्य शासनाने ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची स्थापना संबंधित विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात केली आहे, त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असल्यामुळे सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयही गडचिरोली येथेच स्थापन करण्यात यावे.
गोंडवाना विद्यापीठाशी संबंधित सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कामे गडचिरोली येथे होत असताना सहसंचालक कार्यालयासाठी नागपूर येथे जावे लागत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात अथवा गडचिरोली शहरात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे.
अन्यथा विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संबंधित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक रमेश चौधरी, गटनेता नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, उपस्थित होते.


Post a Comment