विदर्भ दखल न्यूज
अमरावती
अमरावती, ब्युरो. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. वसीम खान बब्बू खान (वय ३९, रा. हैदरपुरा, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उमेश बाबूलाल जाधव (रा. नवसारी, श्रद्धा कॉलनी, अमरावती) यांनी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर कुलूप लावून उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदरपुरा येथील एक व्यक्ती संशयास्पदरित्या चोरीची दुचाकी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती गुन्ह्याचा समांतर तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वसीम खान याला ताब्यात घेतले.
कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीसह जप्त मुद्देमाल गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश दहाटोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Post a Comment