विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज (वडसा),
जि. गडचिरोली | दि. २८ जून २०२६
देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा–सिंड्राई रेती घाट परिसरात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघाताची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मौजा कोंढाळा येथील कोंढाळा–सिंड्राई घाट परिसरात श्री. विलास महादेव देवढगले (वय अंदाजे ३६, रा. जुनी वडसा, ता. देसाईगंज) यांचा अवैध रेती वाहतुकीदरम्यान लोडरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
भरारी पथकाच्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालात १० जून २०२६ नंतर संबंधित रेतीघाटावरील उत्खनन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही त्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना टिस्कुले आणि तलाठी श्री. महादास ठाकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय तहसीलदार, देसाईगंज श्रीमती प्रिती दुडूलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यापुढेही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधातील प्रशासनाची भूमिका अधिक कठोर झाल्याचे स्पष्ट होत असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment