विदर्भ दखल न्यूज
नागपूर ब्युरो
नागपूर
संभाजीनगर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. शहराजवळील देवळाई तांडा येथील साई टेकडी परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी तिघा अल्पवयीन मुलांचा शनिवारी (दि.६ जून) सायंकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन मुलांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला; मात्र त्यांच्या तीन मित्रांना वाचवण्यात यश आले नाही. या घटनेमुळे सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही
सायंकाळच्या सुमारास पाच मित्र देवळाई तांडा येथील साई टेकडी तलावात पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला तलावाच्या काठावर पोहत असताना ते पुढे मध्यभागी गेले. मात्र तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यातील दोघांनी कसाबसा किनारा गाठत स्वतःचा जीव वाचवला. तर तीन मुले काही क्षणांतच पाण्यात बेपत्ता झाली. घटनेनंतर तलावातून बाहेर पडलेल्या दोघांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती नगरसेवक मोहित त्रिवेदी यांना देण्यात आली.
या भीषण दुर्घटनेत विशाल मच्छिंद्र घुले (वय १५), आदर्श गौतम इंगोले (वय १५) आणि यश ज्ञानेश्वर बरंबाईल (वय १६, सर्व रा. लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण हेलावून गेले.

Post a Comment