_शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा मिळणार!मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी मार्गी लावला थकीत चुकाऱ्यांचा प्रश्न..._*

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


गडचिरोली | दि. १९ एप्रिल २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप पणन हंगाम २०२५–२६ मधील धान खरेदीचे प्रलंबित चुकारे तातडीने अदा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून, यासाठी कोट्यवधी 
 निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस  यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*नेमके प्रकरण काय?*
गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर धान विक्री केली होती. मात्र तांत्रिक अडचणी, निधीची कमतरता आणि प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांचे चुकारे दीर्घकाळ प्रलंबित राहिले. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.


या गंभीर बाबीची दखल घेत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी १८ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

शासनाचा मोठा निर्णय: ३३४.४२ कोटींचे वाटप
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला आवश्यक निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्याची कार्यवाही केली आहे:
*मार्केटिंग फेडरेशन, मुंबई मार्फत: ₹१०५.०९ कोटी वितरित*

*आदिवासी विकास महामंडळ, नाशिक मार्फत: ₹२२९.३३ कोटी उपलब्ध*

*एकूण निधी: ₹३३४.४२ कोटी*
या निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील ४,११,६३०.४९ क्विंटल धान खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
*शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम भूमिका*
या संदर्भात बोलताना डॉ. अशोकजी नेते  यांनी स्पष्ट केले:
"शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. त्यांच्या घामाचे योग्य मोबदला वेळेवर मिळणे हा त्यांचा हक्क आहे. गडचिरोलीतील एकाही शेतकऱ्याचे पैसे थकीत राहू नयेत, ही आमची भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर संवेदनशीलतेने निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे."

उर्वरित चुकारेही लवकरच मिळणार
ज्या शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप तांत्रिक कारणांमुळे रखडलेले आहेत, त्यांचे ई-विवरणपत्र प्राप्त होताच उर्वरित निधीही तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या तत्पर निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0/Post a Comment/Comments