विदर्भ दखल न्यूज
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली | दि. १५ मार्च २०२६
“तमसो मा ज्योतिर्गमय : शिक्षकहित, शिक्षणहित, राष्ट्रहित” या संदेशाला अधोरेखित करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे उत्साहात पार पडले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे हित तसेच राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षक परिषद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष अनिल नुतिलकंठावार, दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकरजी कोहळे, वि.प.स. राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी शैलेश पर्वते, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, तसेच मनिषा वाकोडे, सुभाष गोतमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या अधिवेशनाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील माध्यमिक व प्राथमिक शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या विविध समस्या, शिक्षण व्यवस्थेतील बदल तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर यावेळी सखोल विचारमंथन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी शिक्षक परिषदेला शुभेच्छा देत सांगितले की, “शिक्षक हा समाजाचा खरा दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगत त्यांनी शिक्षकांना समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
शिक्षकहित, शिक्षणहित आणि राष्ट्रहित या त्रिसूत्रीचा संदेश देत हे जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.




Post a Comment