जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते गौरव सोहळा उत्साहात...* ------------------------------------------ *राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने महिला सन्मान व संवाद कार्यक्रम*

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


दि. ०८ मार्च २०२६ | गडचिरोली
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने महिला सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवनेरी कॉलनी, आरमोरी रोड, गडचिरोली येथील सौ. मनीषाताई मडावी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


मानवाधिकार संघटना संपर्क कार्यालय कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना संबोधित करताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधारवड नसून समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी प्रेरणादायी शक्ती आहे. कधी शौर्याची ढाल तर कधी मायेची उबदार शाल बनून स्त्री कुटुंब आणि समाजाला बळ देत असते. इतिहासातील अनेक महान स्त्रियांनी आपल्या त्याग, धैर्य आणि नेतृत्वातून समाजाला नवी दिशा दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सुद्धा महिलांचा सन्मान करत महिला भगिंनीसाठी



 अनेक योजना कार्यान्वित केले.तसेच  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आणली.  त्या प्रेरणेतून आजच्या महिलांनीही विविध क्षेत्रात पुढे येत समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी पत्रकारिता, गायन, योग, उद्योजकता तसेच सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित महिलांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.


कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी,जावेदा शेख, तेजस्विनी भजे,राणी गोपशेटिवार, लता लाटकर,पुनम हेमके, यांच्यासह महिला कार्यकर्त्या व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी रेखाताई डोळस, डॉ. भारत खटी आणि योगिता पिपरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे व समाज प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा मडावी,सूत्रसंचालन मानवाधिकार संघटनेच्या शहराध्यक्षा स्नेहा मेश्राम तर आभार खेडेकर ताई यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत समाजात महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश दिला.

0/Post a Comment/Comments