विदर्भ दखल न्यूज
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
वैरागड : विराट राज्याची ऐतिहासिक साक्ष देणारी वैरागड नगरी व वीरश्रीचा इतिहास सांगणारा टिप्पागड किल्ला यांचे संवर्धन करण्यात येईल, असा ठाम निर्धार माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केला. वैरागड येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ साप्ताहाच्या समारोपीय सांगता समारोहात उपस्थित भाविक व नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
पंडित विनोद बिहारी गोस्वामी महाराजांच्या आदेशानुसार वैरागड व टिप्पागड या दोन्ही गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले. गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, ते आपल्या संस्कृतीचे, शौर्याचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. आगामी पिढीला आपला इतिहास अभिमानाने सांगता यावा यासाठी गड-किल्ल्यांचे जतन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी त्यांनी नागरिकांना गडकिल्ल्यांच्या इतिहासाची माहिती देत संवर्धनात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच ऐतिहासिक वारशाचे जतन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच केंद्र व राज्य सरकारचे गड किल्ल्याचे संवर्धन करण्याचे धोरण असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जे आपल्या या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे पाठपुरवठा करून सदर कार्य पूर्ण करण्याची ग्वाही दिली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या समारोपीय कार्यक्रमाने उपस्थित भाविकांना इतिहास व अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या समारोपीय कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर पाटील पोरेटी, भाजपा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक योगिता पिपरे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, गडचिरोली नगरपरिषद सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी सभापती वैष्णवी नैताम, माजी नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका सौं. निंबोड, काँग्रेस चे आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, आयोजक माजी जिप सभापती विश्वास भोवते, शितल सोमनानी, अरुण हर्षे, सुभाष हर्षे, वैरागड चे सरपंच संगीता पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी गडकिल्ले संवर्धनाच्या संकल्पास आपला पाठिंबा दर्शविला.
भक्ती, इतिहास आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम ठरलेल्या या कार्यक्रमामुळे वैरागड व टिप्पागड किल्ल्यांच्या संवर्धनाला नवे बळ मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


Post a Comment