विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
देसाईगंज : सध्या जिल्हाभरात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाली असून शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही सुरू न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. बाजार समित्यांमध्ये धानाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तोट्याने धान विकण्याची वेळ येत आहे.
या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुक्यातील विविध सहकारी संस्था, शेतकरी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार मा. श्री. कृष्णा गजबे यांची भेट घेऊन शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांची व्यथा आणि सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेतल्यानंतर मा. गजबे यांनी जिल्हाधिकारी श्री. अविनाश पांड्या यांच्याकडे निवेदनाद्वारे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.
मा. आमदार श्री. कृष्णा गजबे यांनी प्रशासनाला सूचित केले की, “शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देऊ नका. सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीतच प्रत्येक शेतकऱ्याचे धान खरेदी झाले पाहिजे.”
त्यांच्या या मागणीची दखल घेत मा. जिल्हाधिकारी श्री. अविनाश पांड्या यांनी येत्या काही दिवसांत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
या चर्चासत्रात आणि निवेदन सादरीकरणावेळी जिल्ह्यातील विविध खरेदी-विक्री सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला न्याय्य दर मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment