करपडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात.. जुना मलबा न हटवल्याने विंचू ,सापांचा विळखा.. प्रशासनाचे दुर्लक्ष..

विदर्भ दखल न्यूज 
वैरागड वार्ताहर:



वैरागड 
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या करपडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विंचू, सापांसारख्या धोकादायक जीवांच्या सहवासात शिक्षण घ्यावे लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शाळेच्या इमारतीला लागून असलेली जुनी, जीर्ण इमारत काही दिवसांपूर्वी कोसळली. मात्र, त्या इमारतीचा मलबा अद्यापही जागेवरच पडून आहे. या मलब्यात विंचू, साप आणि इतर विषारी कीटकांनी आश्रय घेतल्यामुळे शाळा परिसरात त्यांचा वावर वाढला आहे. अनेकदा हे जीव वर्गखोलीजवळ येताना दिसल्याचे पालक सांगतात.


या धोक्याबाबत शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा लेखी तसेच तोंडी स्वरूपात तक्रारी केल्या. तरीही मलबा हटवण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे “ग्रामपंचायत प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे” असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने मलबा हटवून परिसर स्वच्छ करण्याची आणि आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन दुर्घटना टाळावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments