विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
आरमोरी तालुका | आरमोरी तालुक्यातील इंजेवारी (ता. आरमोरी) गावात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील रहिवासी श्रीमती कुंदा खुशाल मेश्राम (वय अंदाजे ६० वर्षे) या आपल्या शेतात कामानिमित्त गेल्या असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या. ही घटना आज दुपारी अंदाजे १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान पेवटी–बोडी परिसरातील त्यांच्या स्वतःच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात घडली.
शेतात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक कानठळ्या बसवणाऱ्या ओरडण्याचा आवाज शेजारच्या शेतकऱ्यांना ऐकू आला. काही क्षणांतच वाघाने कुंदाबाई यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. जिव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी वाघाच्या जोरदार हल्ल्यापुढे त्या टिकू शकल्या नाहीत. घटनेनंतर वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनास्थळी तात्काळ पोलिस व वनविभागाचे पथक पोहोचले. पंचनामा, मृतदेहाची तपासणी, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून परिसरात सतत वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, वनविभागाकडून वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
इंजेवारीसह पेवटी–बोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याने नागरिकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. परंतु आजची घटना अत्यंत धक्कादायक ठरली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत गावात भीती निर्माण झाली आहे. शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांची पावले आता दुप्पट सावधगिरीने पडताना दिसत आहेत.
कुटुंबावर दुहेरी आघात
कुंदाबाई यांच्या कुटुंबावर या घटनेमुळे मोठे दुःख कोसळले आहे. मागील वर्षीच त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच आजची घटना कुटुंबासाठी आणखी मोठा आघात ठरली आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, सून आणि दोन नातू असा परिवार आहे. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.
नागरिकांची मागणी : तात्काळ उपाययोजना करा
या परिसरात सलग घडणाऱ्या वन्यजीवांच्या हालचालीमुळे नागरिकांनी वनविभागाला अलर्ट राहण्याची मागणी केली आहे. वाघाला पकडण्यासाठी पिंजरे, पथक, पेट्रोलिंग वाढवणे, तसेच गावांमध्ये जागृती मोहीम राबवण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.
वन-मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरत आहे. आजची घटना प्रशासनाने गंभीरपणे घेण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
या भीषण घटनेने इंजेवारी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment