प्रा डॉ. मेश्राम यांच्या इंग्रजी कवितासंग्रहाचे वर्ल्ड बुक फेअरमध्ये प्रकाशन..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


आरमोरी -
प्रसिद्ध कवी व आरमोरी येथील महात्मा गांधी कला,विद्वान व स्व.न. प.वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.नोमेश नारायण मेश्राम यांच्या "अ वून्डेड स्काय" या इंग्रजी कवितासंग्रहाचे प्रकाशन दिल्ली येथे १० ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित वर्ल्ड बुक फेअर ( जागतिक पुस्तक मेला) मध्ये होणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रणी आणि अत्यंत प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक संपादन केलेल्या ब्लूरोज पब्लिशिंग हाऊस लंडन यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून या कवितासंग्रहात त्यांच्या शंभर इंग्रजी कवितांचा समावेश आहे.जगातील इंग्लंड, अमेरिका तसेच इतर १४० पेक्षा अधिक देशांमध्ये पुस्तक वितरण व्यवस्था असलेली ब्ल्यूरोज ही एक महत्वाची व दर्जेदार साहित्य प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था मानली जाते.
अध्यक्षस्थानी ब्लूरोज पब्लिशिंग हाऊसच्या दिल्लीस्थित शाखेचे समन्वयक सय्यद अर्शद राहणार आहेत.
प्रा.डॉ.नोमेश मेश्राम हे म.गांधी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख असून विदर्भातील नामवंत कवी,गझलकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते." अ वून्डेड स्काय" या इंग्रजी कवितासंग्रहात भारतातील सर्वहारा समाजातील लोकांची दैन्यावस्था,स्वातंत्र्य, समता,न्यायाची होत असलेली गळचेपी,शोषण, जागतिकीकरणात विविध ज्वलंत प्रश्नांनी विद्रुप झालेल्या भारताचे वास्तववादी चित्र रेखाटले आहे.त्यांचे "वेदना आभाळ झाली" ,"वादळांच्या कविता" ,"रक्तफुलांचे ताटवे" हे मराठी कवितासंग्रह प्रकाशित झाले असून "रक्तफुलांचे ताटवे" या राजहंस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित कवितासंग्रहाला महाराष्ट्रात २५ पेक्षा अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या कविता महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.त्यांचा "अ वून्डेड स्काय " हा पहिलाच इंग्रजी कवितासंग्रह असून अभिनव शैली,अभिव्यक्तीतील नवता व पराकोटीच्या संवेदनशीलतेने ठळकपणे इंग्रजीच्या काव्यप्रांतात निशाण रोवणाऱ्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन ब्लूरोज पब्लिशिंग हाऊसने केले आहे.

0/Post a Comment/Comments