मुख्याध्यापक सुनील पटारे महापौर पुरस्काराने सन्मानित...



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे
मुंबई व ठाणे जिल्हा


शहापूर, दि. १९ : बृहन्मुंबई महानगरपालिका सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार वितरण समारंभ १७ सप्टेंबर रोजी भायखळा येथील पेंग्विन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पाहूणे म्हणून मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर व महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एकूण ५० शिक्षकांना शाल, श्रीफळ, फेटा, ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात मुंबई महापालिका नगरबाह्य तानसा शाळेचे मुख्याध्यापक सुनील पटारे यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुनील पटारे हा पुरस्कार मिळवणारे तानसा शाळेचे पहिले शिक्षक ठरले. या यशामुळे पटारे सरांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच तानसा शाळा परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना दिली. सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले. अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी शाळेला नवे रुप प्राप्त करुन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी खान अकॅडमी, गणित गुरुवार, वाचन उपक्रम, विज्ञान प्रकल्प अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करुन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
समाजाशी शाळेचे नाते दृढ करण्यासाठी पालकांना शाळेशी जोडले. शाळेला सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे पालकांचा विश्वास, समाजाचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या तिन्ही गोष्टी शाळेला लाभल्या. महापौर पुरस्कार हा त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण व निष्ठेचा योग्य गौरव ठरला आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, शिक्षकांना उत्साह व पालकांना समाधान मिळाले आहे.


मुलुंड ‘टी’ विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलासचंद्र आर्य, तानसा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश लिखार, विभाग निरीक्षक रमेश अडगाळे, रेऊ साबळे, कनिष्ठ पर्यवेक्षिका रेणु निशाणे, शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष किरण पाटील, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी सुनील पटारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments