गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
, ता. 12 सप्टेंबर 2025 —
आरमोरी तालुक्यातील मोहटोला (कुकडी) येथील दिनकर महादेव टेंभुर्णे (वय ६५) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.
दिनकर टेंभुर्णे यांच्या नावे ६ एकर शेती असून, मागील वर्षी उत्पादनात अपयश आल्याने यंदा ५ एकर जमिनीत आवत्या धान पद्धतीने पेरणी केली होती, तर उरलेल्या एका एकरात रोवणी केली होती. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून सुमारे ५०,००० रुपयांचे कर्जही घेतले होते.
मात्र, सततच्या अतिवृष्टीमुळे धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाचे गणित कोलमडले. टेंभुर्णे यांनी वेळोवेळी
कीटकनाशकांची फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंता वाढल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिनकर टेंभुर्णे यांना कोणताही गंभीर आजार नव्हता, तसेच घरात कोणताही वाद नव्हता. त्यामुळे ही आत्महत्या अधिक चिंतेची बाब ठरत आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने तातडीने याची चौकशी करून टेंभुर्णे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.


Post a Comment