पोलीस प्रशासनानी तंबाखू कारखान्यावर मारली धाड. एका आरोपीला अटक तर चार आरोपी फरार..

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी दि. 3 राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्री च्या विरोधात गडचिरोली जिल्हा पोलिसांनी 2 सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत आरमोरी तालुक्यातील डार्ली येथे सुरु असलेला अवैध सुगंधित तंबाखूचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला. या पोलीस कारवाईत तब्बल सुमारे 7 लाख 84 हजार 200 रुपयांचा तंबाखू व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामधील मुख्य आरोपी ओमप्रकाश शंकर गेडाम रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याला पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर चार आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलिस प्रशासनांनी शोध सुरु केला आहे. स्थानिक जिल्हा गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


आरमोरी तालुक्यातील डार्ली येथील सौ. रेखाबाई सडमाके यांच्या घरात आरोपींनी 'मजा 108 हुक्का शिशा तंबाखू'सह विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्यासाठी मशिन बसवून अवैध कारखाना सुरु केला होता. पोलिसांनी पंचासमक्ष घराची झडती घेतली असता शेकडो टिनाचे तंबाखूचे डबे, मोठ्या प्रमाणात कच्चा तंबाखू, पॅकिंग मशिन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बॅग क्लोजर मशीन, हुक्का शिशा



 पॅकिंगसाठी वापरलेले हेअर स्ट्रेटनर तसेच विविध पॅकिंग साहित्य मिळून आले. एकूण 3.31 लाखांचा अवैध तंबाखू साठा आणि 4.53 लाखांची मशिनरी व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments