गडचिरोली सुपरफास्ट
न्युज वृत्तसेवा
कुरखेडा ब्युरो
कुरखेडा (प्रतिनिधी) – कुरखेडा तालुक्यातील सती नदीवर पुलाचे काम सध्या संथ गतीने सुरू असून, या कामामुळे मुख्य मार्ग बंद करण्यात आलेला आहे. परिणामी, नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून आंधळी गावामार्गे प्रवास करावा लागत आहे. मात्र, सध्या हा पर्यायी मार्ग देखील अतिशय खराब अवस्थेत असून, खड्डे, चिखल, वळणावळणाचे अरुंद रस्ते आणि धोकादायक ठिकाणांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सदर समस्येची गंभीर दखल घेत आज आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास मसराम यांनी आंधळी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम विभाग (जिल्हा परिषद), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नेशनल हायवे विभाग, लघु पाटबंधारे विभाग आणि सद्य:स्थितीत पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांना तात्काळ बोलावून मार्गाची सविस्तर माहिती घेतली.
मार्ग दुरुस्तीचे आदेश – ४८ तासांची मुदत
पाहणीनंतर आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारास दोन दिवसांच्या आत (४८ तासांत) पर्यायी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले. “नागरिकांचा रोजचा प्रवास या मार्गावरून होत आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहतूक, शेतकरी, व्यापारी सर्वसामान्य जनतेसाठी हा मार्ग सुकर आणि सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
अधिकार्यांची गोंधळलेली स्थिती – समन्वयाचा अभाव स्पष्ट
पाहणी दरम्यान दिसून आले की विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असून, कोणत्याही विभागाने पर्यायी मार्गाच्या देखरेखीची जबाबदारी घेतलेली नव्हती. आमदार मसराम यांनी सर्व विभाग प्रमुखांना झापत, समन्वयाने काम करून मार्ग तत्काळ दुरुस्त करण्यास सांगितले.
स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया
स्थानिक नागरिकांनी आमदारांसमोरच आपला रोष व्यक्त करताना सांगितले की, “हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत आहे. पावसाळ्यात तर गाड्या घसरून अपघात होत आहेत. लहान मुले शाळेत जाताना पडतात. याकडे कोणीही लक्ष दिले नाही.”
असे नागरिकांनी सांगितले.

Post a Comment