आमदार रामदास मसराम यांच्या पाठपुराव्याला यश; नागपूर–कोरची व नागपूर–कुरखेडा बससेवा ६ मार्चपासून सुरू

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


कोरची / कुरखेडा : आमदार रामदास मसराम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागणीचा सकारात्मक विचार करून नागपूर–कोरची, कोरची–नागपूर तसेच नागपूर–कुरखेडा, कुरखेडा–नागपूर या बससेवा अखेर सुरू करण्यात आल्या आहेत. ०६ मार्च २०२६ पासून या बस नियमितपणे धावणार असून परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागपूर–कोरची मार्गावरील बस नागपूर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटून सायंकाळी ०६.५० वाजता कोरची येथे पोहोचेल. सदर बस कोरची येथे मुक्कामास राहील. त्यानंतर कोरचीवरून सकाळी ०६.३० वाजता सुटून नागपूर येथे १०.३५ वाजता पोहोचेल.

तसेच नागपूर–कुरखेडा मार्गावरील बस नागपूर येथून पहाटे ०५.१५ वाजता सुटून सकाळी ०८.२५ वाजता कुरखेडा येथे पोहोचेल. कुरखेडा वरून ही बस सकाळी ०९.०० वाजता सुटून दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

या बससेवेच्या सुरूवातीमुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रवासाची मोठी अडचण दूर होणार आहे. विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि शासकीय कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार मसराम यांचे आभार मानले असून भविष्यातही अशाच विकासकामांना गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments