कुरुड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालय ठरत आहे सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतीसाठी प्रेरणादाई केंद्र. मनोज ढोरे यांच्या पुढाकाराने शैक्षणिक चळवळीला मिळत आहे बळ..




विदर्भ दखल न्यूज 
देसाईगंज 


देसाईगंज - ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य दिशा, अभ्यासाला पोषक वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री मिळावी या उद्देशाने कुरुड येथे सुरू करण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालय आज प्रेरणादायी केंद्र म्हणून ओळखले जात आहे. या वाचनालयाची संकल्पना व प्रत्यक्ष अंमलबजावणी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.
आजच्या स्पर्धात्मक काळात शिक्षण असूनही बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक युवक-युवती निराशा व संभ्रमात अडकले आहेत. अशा परिस्थितीत अभ्यासासाठी शांत, स्वच्छ व शिस्तबद्ध वातावरण देणारे हे वाचनालय युवकांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. येथे एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, एसएससी, बँकिंग, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच विविध शासकीय व निमशासकीय परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे व अभ्याससाहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.


ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेस परवडत नसल्याने हे वाचनालय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. वाचनालयामुळे युवकांमध्ये अभ्यासाची शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक तयारीची जाणीव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याप्रसंगी मनोज ढोरे यांनी सांगितले की, “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे. युवकांना योग्य दिशा मिळाली, तर ते स्वतःचे आणि समाजाचे भविष्य उज्ज्वल करू शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांप्रमाणे समाज घडवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
या उपक्रमाला स्थानिक नागरिक, पालकवर्ग व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कुरुड परिसरात हे वाचनालय ज्ञान, प्रेरणा आणि आत्मनिर्भरतेचे केंद्र बनत आहे.

0/Post a Comment/Comments