प्रतिनिधी :
दिलीप अहिनवे,
मुंबई व ठाणे जिल्हा
भिवंडी, दि. २५ : ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री महादेव बाबुराव चौगुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी ग्रामीण तालुक्याची शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन सभा २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता चौघुले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. सभेला भिवंडी ग्रामीणमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सभेला मार्गदर्शक पाहुणे म्हणून भिवंडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय आसवले, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे, धर्मेंद्र यादव व सिद्धार्थ वाघमारे, साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, श्री महादेव बाबुराव चौगुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक दहिवले, क्रीडा केंद्रप्रमुख गुणवंत बेलखेडे, राष्ट्रीय कुस्ती पंच श्रीराम पाटील व ठाणे जिल्हा स्टाडर्स ॲथलेटिक्स किड्स
कपचे समन्वयक सुशील इनामदार हे उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी आसवले यांनी सांगितले की, भिवंडी ग्रामीण तालुक्यात सध्या एकूण ३२५ शाळा असून ७२००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सर्व शिक्षक करत असतात. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यचे काम या तालुक्यातील क्रीडा शिक्षक जोमाने करत आहेत. भिवंडी तालुक्याला क्रीडेची उत्तम परंपरा आहे. कुस्ती व कबड्डी खेळात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. क्रीडा अधिकारी सिद्धार्थ यादव यांनी सांगितले की, शाळा व खेळाडूंसाठी शासनाच्या विविध योजना असतात. क्रीडा शिक्षकांनी त्या योजना स्वतः समजून घेऊन शाळा व खेळाडूंना त्या योजनांचा फायदा मिळवून द्यायला हवा.
सभेचे प्रास्ताविक भिवंडी ग्रामीण तालुक्याचे क्रीडा केंद्रप्रमुख गुणवंत बेलखडे यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक विठ्ठल दिवेकर यांनी तर शेवटी सर्वांचे आभार क्रीडाशिक्षक नितीन पाटील यांनी मानले.


Post a Comment