नागपूर जिल्ह्यात स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तर गडचिरोलीत सहा नवीन अप्पर तहसील. जनतेच्या कामाकरिता शासनाचा निर्णय..


विदर्भ दखल न्यूज 
नागपूर 


नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नागपूर ग्रामीणसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तर नागपुरात ९ व गडचिरोलीत ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली आणि प्रशासकीय कामांसाठी अधिक जवळच्या ठिकाणी सेवा उपलब्ध होणार असून, वेळ, प्रवासाचा खर्च आणि जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्यांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील चार ठिकाणी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना विविध महसुली कामांसाठी नागपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते.

जमीनविषयक प्रकरणे, महसुली कायद्यांशी संबंधित बाबी, पुनर्वसन तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी वारंवार जिल्हा मुख्यालयात ये-जा करावी लागते. नागपूर ग्रामीणसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर या कामांचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच प्रशासकीय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या नवीन कार्यालयांमुळे सामान्य जनतेचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच प्रशासकीय कामांना मोठी गती मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील कार्यालये

नागपूर (ग्रामीण) : बुटीबोरी, हिंगणा : हुडकेश्वर, नागपूर (शहर) : वानाडोंगरी, कामठी : पारडी, काटोल : वडोदा, नरखेड : कोंढाळी आणि जलालखेडा, मौदा : कोदामेंढी, कुही : वेलतूर

नागपूर जिल्ह्यात ९ अपर तहसीलदार

नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ९ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू केली जात आहेत. यासोबतच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेला शासकीय सेवा जलद गतीने मिळण्यासाठी जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

या कार्यालयांमुळे नागरिकांना जमिनीचे फेरफार, विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महसुली सेवा त्वरित मिळतील. सुरुवातीला ही कार्यालये तात्पुरत्या इमारतींमध्ये सुरू केली जाणार आहेत.

असे राहणार विभाजन अपर जिल्हाधिकारी कार्यालय

(नागपूर) : नागपूर शहर, पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, भिवापूर, उमरेड, कामठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय (ग्रामीण) : कळमेश्वर, नरखेड, काटोल, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), सावनेर
नागरिकांना होणार फायदा

महसुली कामासाठी केवळ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी किंवा प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी ग्रामीण भागातून नागपूर शहरात येणे अनेक नागरिकांसाठी वेळखाऊ आणि खर्चिक ठरते. सार्वजनिक वाहतूक किंवा खासगी वाहनाने शहरात येऊन दिवसभर प्रशासकीय कामासाठी थांबावे लागते. नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे ग्रामीण नागरिकांचा हा वेळ आणि प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

अतिदुर्गम भागाला मोठा दिलासा

गडचिरोलीत ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये कुरखेडा : मालेवाडा, आरमोरी: वैरागड, धानोरा : पेंढरी, सिरोंचा : आसरअल्ली, एटापल्ली : कसनसूर, अहेरी: जिमलगट्टा यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments